मेडीकल प्रवेशासाठी एसबीसींना २ टक्के स्वतंत्र आरक्षण कधी ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीयांसाठी सर्व जिल्हा ठिकाणी भाड्याने इमारती घेऊन चालू शैक्षणिक वर्षापासूनच वसतीगृहाची सोय करावी तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी २ टक्के स्वतंत्र आरक्षण तातडीने लागू करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी जिल्हा ठिकाणी वसतीगृह बांधण्यासाठी या वर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण या वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण होण्यास निश्चितच काही कालावधी लागणार आहे. शासनाने इतर मागास वर्गीय मुलांसाठी १२ तर मुलींच्या १८ वसतीगृहांना मंजूरी दिलेली आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह मंजूर केल्यानंतर त्याचवर्षी सुरुही करण्यात येते, त्याच धर्तीवर ओबीसींसाठीही चालु शैक्षणिक वर्षांपासूनच वसतीगृहांची सोय करावी. सर्व जिल्हा ठिकाणी भाड्याने इमारती घेऊन या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करावी, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विशेष मागास प्रवर्गाच्या मेडीकल प्रवेशासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या प्रवर्गासाठी २ टक्के स्वतंत्र आरक्षण आहे. पण हे आरक्षण वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मेडीकलच्या प्रवेशासाठीही २ टक्के स्वतंत्र आरक्षणाचा लाभ लागू व्हावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. २०१८ च्या हिवाळी अधिवेशानामध्ये हा प्रश्न उपस्थित केला असता विशेष मागास प्रवर्गाला मेडीकलमध्येही स्वतंत्र आरक्षण लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या आरक्षणाचा लाभ देण्यास विलंब करुन विशेष मागास प्रवर्गावर अन्याय केल्यासारखेच आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मेडीकलसाठी स्वतंत्र २ टक्के आरक्षण लागू करावे, या मागणीचा वडेट्टीवार यांनी पुनरुच्चार केला.