मुंबईत राष्ट्रवादीला धक्का ; सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर हे आज ११ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मातोश्री बंगल्यावर ते आपल्या शेकडो कार्यकरत्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज ११ वाजता ते मातोश्रीवर होणा-या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेचे बळ वाढणार आहे. सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे अशीच साथ पुढे कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अकरा वाजता मातोश्री निवासस्थांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सचिन अहिर यांच्या या शिवसेना प्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सोबत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातात शिवबंधन बांधणार असल्याने शिवसेनेची वरळीत मोठी ताकद वाढणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुनिल शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता शिवसेनेची ताकद वाढणार असल्याने या मतदारसंघातून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे निवडणुक लढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.