राष्ट्रवादी तोडण्याचे नव्हे तर; शिवसेना वाढविण्याचे काम करणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी तोडण्याचे नाही तर शिवसेना वाढविण्याचे काम करणार असल्याची ग्वाही आज राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहिर यांनी दिली. मातोश्री निवासस्थानी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सचिन अहिर यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज राष्ट्रवादीला रामराम करीत हाती भगवा ध्वज घेतला. आज मातोश्री निवासस्थानी सचिन अहिर आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत केले तर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडले असतानाच आपण राष्ट्रवादीला तोडण्याचे काम करणार नाही तर शिवसेना वाढविण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेनेत फोडलेली नव्हे तर मनानी जोडलेली माणसे हवी असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अहिर यांचे शिवसेनेत स्वागत केले. राज्यात शिवसेनेची ताकद वाढत असून, सचिन अहिर यांना शिवसेनेत आल्याचा पश्चाताप होणार नाही अशी खात्री शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली.यावेळी सचिन अहिर यांना नविन जबाबदारी देण्याचे सूतोवाच ठाकरे यांनी केले.
शरद पवार यांची साथ सोडल्याचे दुख होत असून, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणार असल्याची प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी प्रवेश करण्यापूर्वी दिली. राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी शरद पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. २० वर्षे राष्ट्रवादीत काम करत असताना हा निर्णय घेताना अवघड वाटत असल्याचे सांगतानाच मी जबाबदारी पार पाडणार नेता असल्याने शिवसेना जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचे अहिर यांनी सांगितले. शिवसेना प्रवेशापूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.