रेल्वेच्या मदतीला एसटी आली धाऊन …!

रेल्वेच्या मदतीला एसटी आली धाऊन …!

मुंबई नगरी टीम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी २५ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरच्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांची  गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी दिले. त्यानुसार एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे, येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज १८० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा २४ फेऱ्या  सुरु करण्यात येत आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने मुंबई विभागातून ५०, ठाणे विभागातून ५०, पुणे विभागातून ७०, आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून १० अशा १८० जादा बसेस दररोज सोडण्याचे नियोजन केले आहे.उपरोक्त बसस्थानकात जादा बसेसचे नियोजन करण्यासाठी समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रवासी मागणीनुसार त्या-त्या बसस्थानकावरून विशेष बसेस सोडण्यात येतील.

Previous articleराज्यातील ४९७ सिनेमागृहात उद्या ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार
Next article“सेवा आपल्या दारी” उपक्रमातंर्गत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची टीम थेट रिक्षा चालकांपर्यंत