मुख्यमंत्र्यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देण्यात येणार असून आगामी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी मंगळवारी मुंबईत दिली.
माधवी नाईक म्हणाल्या की, रक्षाबंधनाच्या निमित्ताने २१ लाख भगिनींपर्यंत पोहचण्याचा महिला मोर्चाचा संकल्प आहे. विविध क्षेत्रातील आणि विविध समाजघटकातील महिलांशी भाजपाचे कार्यकर्ते संपर्क साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या विविध विकास योजनांच्या लाभार्थी महिलांशी संपर्क साधण्यात येईल. या महिलांकडून मुख्यमंत्र्यांसाठी राख्या स्वीकारण्यात येतील. भाजपाचे कार्यकर्ते महिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना मा. मुख्यमंत्र्यांचे पत्र देतील व त्यांना राखीसोबत मुख्यमंत्र्यांना लेखी संदेश देण्याची विनंती करतील. संबंधित महिलेने कार्यकर्त्याकडे राखी दिल्यानंतर ९२२७१९२२७१ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन अभियानाशी थेट जोडून घ्यावे, अशी अपेक्षा आहे.
त्या म्हणाल्या की, १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात राखी संकलनाचे काम चालेल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकत्रितपणे राख्या देण्याचा कार्यक्रम १६ ऑगस्ट मुंबईत षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या संपर्क अभियानासाठी ९७२ महिला कार्यकर्त्या फिल्डवर काम करत आहेत. कार्यक्रमाचे नेतृत्व भाजपा महिला मोर्चा करणार असला तरी भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, शक्तीकेंद्रप्रमुख कार्यक्रम यशस्वी होण्याकरता काम करत आहेत.ज्यांना प्रत्यक्ष राखी पाठवता येणार नाही त्यांनी rakhi2cm.com या वेबसाईटवर व्हर्चुअल राखी व संदेश पाठवावा, असेही आवाहन ॲड. माधवी नाईक यांनी केले.