महाजनादेश यात्रेदरम्यान जेव्हा मुख्यमंत्री टपरीवर चहा घेतात

महाजनादेश यात्रेदरम्यान जेव्हा मुख्यमंत्री टपरीवर चहा घेतात

मुंबई नगरी टीम

गडचिरोली :  चार दिवसांपूर्वी गुरुकुंज मोझरी येथून निघालेल्या महाजनादेश यात्रेचा आज रविवारी दुपारी साडे पाचशे किलोमीटर प्रवास झाला. क्षणन क्षण व्यस्तता…. सभा,स्वागत, भाषण, गर्दी आणि प्रवासातही पत्रकार, मान्यवर, नेते यांच्याशी चर्चा… अविश्रांत परिश्रम… पोटतिडकीने संवाद…. मनापासून जनसमुदायांना अभिवादन… रथातच जेवण… डुलकी घ्यायची पण सोय नाही. पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेली चहाची तलफ आणि त्या निमित्त यात्रेला मिळालेले विरंगुळ्याचे काही “यथार्थ” क्षण अनुभवायला मिळाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज चौथ्या दिवशी सकाळी गोंदिया वरून गडचिरोलीकडे रवाना झाली. मार्गात अर्जुनी सडक ते अर्जुनी मोरगाव या दोन गावांमध्ये नवेगाव बांधचे हिरवेकंच दाट जंगल लागले. पावसाळी वातावरण, हवेतील गारवा आणि डोळ्यांना कमालीचा सुखावणारा हिरवा निसर्ग यात वाफाळलेल्या चहाची जोड मिळाली तर हा आनंद अवर्णनीय ! सुमारे दोनशे वाहनांचा ताफा एकदम जंगलात थांबला. कारण मुख्यमंत्र्यांना टपरीवरचाच चहा घ्यायचा होता. यथार्थ नावाचे छोटे चहाचे दुकान मुख्यमंत्र्यांना दिसले आणि त्यांनी लगेच वाहन थांबवण्यास सांगितले. आपल्या रथातून उतरून समोरच्या बाकड्यावर बसून मुख्यमंत्र्यांनी दुकानदाराला काळा चहा बनवायला सांगितला. काही क्षण दुकानदार देखील भांबावला होता. फारशी गजबज नसलेल्या या रस्त्यावर अचानक कधी मुख्यमंत्री आपल्या टपरीवर चहा घेतील असा विचार दुकानदाराच्या मनालाही कधी शिवला नसेल! मुख्यमंत्र्यांनी वाफाळलेल्या चहाच्या पहिल्याच घोटाला भरभरून दाद दिली. दुकानदाराच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते.

एव्हाना आजूबाजूचे काही लोक व लहान मुलं मुख्यमंत्र्यांच्या अवती भोवती जमा झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याजवळ आलेल्या एका चिमुरड्याला आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि लहान मुलांशी मस्त गप्पा मारल्या. मला तुम्ही ओळखता काय, विचारल्यावर लहान मुलाने “देवेंद्र फडणवीस” असे उत्तर दिल्यावर सर्वांना खळखळून हसायला आले. या खेड्यातील मुलांना देवेंद्रजींनी बोलते केले. सगळ्यांशी हस्तांदोलन केले. तोपर्यंत सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली होती. मात्र,मुख्यमंत्री सहजपणे मुलांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये रमले होते. महाजनादेश यात्रेतील विरंगुळ्याचे हे क्षण यथार्थ ठरले.

Previous articleपावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ
Next articleपंकजाताई मुंडेंच्या मदतीमुळे शेतमजुराचा मुलगा होणार डॅाक्टर