पंकजाताई मुंडेंच्या मदतीमुळे शेतमजुराचा मुलगा होणार डॅाक्टर

पंकजाताई मुंडेंच्या मदतीमुळे शेतमजुराचा मुलगा होणार डॅाक्टर

मुंबई नगरी टीम

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित घटकांची सेवा केली, त्यांचा हाच वारसा पुढे नेण्याचे काम राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे ह्या करत असून आज त्यांनी दिलेला शब्द पाळत शेतमजुराचा मुलगा असलेल्या गोरखला एमबीबीएस प्रवेशासाठी १ लाख ५१ हजाराची मदत सूपूर्द केली.

गुणवत्ता असूनही बिकट आर्थिक स्थितीमुळे एमबीबीएस प्रवेश अनिश्चित झालेल्या कळंब (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील भोगजी गांवचा रहिवासी असलेल्या गोरख मुंडे यांस  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख ५१ हजाराची मदत देण्याचे  पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते, दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आज गोरखला गोपीनाथ गडावर बोलावून त्याला मदतीचा धनादेश दिला. यावेळी गोरखचे वडील, त्याची बहिण व शिक्षक राजेंद्र बिक्कड उपस्थित होते.

गोपीनाथ गडाची स्थापना मुळातच वंचित घटकांच्या सेवेसाठी झाली आहे, गोरखचा प्रवेश अनिश्चित झाल्याची माहिती मला माध्यमांतून मिळाली, हुशार असूनही आर्थिक कारणावरुन प्रवेश होत नाही   याविषयी खंत वाटली.  त्याचा संपर्क होत नसल्याने मी ट्विट केले आणि आज  त्याचा संपर्क झाला. या अगोदरही प्रतिष्ठानने अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे असे सांगत  कमवा, शिका आणि परिस्थितीवर मात करून पुढे जा असा मौलिक सल्ला  पंकजा मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना तरूणांना दिला.

आईविना पोरक्या असलेल्या शेतमजुराच्या होतकरू मुलाला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ‘एमबीबीएस’ च्या प्रवेशासाठी प्रचंड फीस भरण्यासाठी अडचण येत होती.मेडीकल प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या  देश पातळीवरील नीट परीक्षा गोरख चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला खरा पण आर्थिक परिस्थिती अभावी प्रवेश रखडला आज पंकजाताई मुंडे यांच्यामुळे माझ्या  प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे, मुंडे साहेबांच्या साक्षीने मी निश्चित डॅाक्टर होईल हे सांगतांना गोरख व त्याच्या वडिलांना गहिवरून आले.

Previous articleमहाजनादेश यात्रेदरम्यान जेव्हा मुख्यमंत्री टपरीवर चहा घेतात
Next articleराज्याला नैसर्गिक संकटात सोडून मुख्यमंत्री प्रचारात मग्न :  नाना पटोले