पाच वर्षे कामे केली असती तर यात्रा काढावी लागली नसती

पाच वर्षे कामे केली असती तर यात्रा काढावी लागली नसती

मुंबई नगरी टीम

जुन्नर : पाच वर्षे कामे केली असती तर तुम्हाला यात्रा काढावी लागली नसती असा टोला डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला.छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी शिवरायांचे साधं नावही संसदेत घेतले नाही हे दुर्दैव आहे. परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचे नाव घेत संसद दणाणून सोडले होते हेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या महायात्रेत ते बोलत होते.

शिवसेनेने विमा कंपन्यांना इशारा देवून आजचा १८ वा दिवस आहे परंतु पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हे सरकार कोणाच्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा असेही डॉ.  कोल्हे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे नागपुर आज क्राईम कॅपिटल झाले आहे. कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा असा सवाल करतानाच येत्या विधानसभा निवडणुकीत या सगळ्याचा जाब या सरकारला विचारायला सज्ज व्हा असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.साडेतीनशे वर्षापुर्वी अफझलखान स्वराज्यावर चालून आला होता. आता ही उपमा कोणाला दिली नाही. नाहीतर पत्रकार मी उपमा दिली ही ब्रेकींग देतील हे सांगताच सभेत हास्याचा फवारा उडाला. त्यावेळी अफझलखानाने फतवा काढला होता. आमच्यात सामील व्हा नाहीतर घरादारावरुन नांगर फिरवू हा फतवा मिळाल्यावर सरदार बिथरले होते. आताचा याच्याशी योगायोग आहे असे समजू नका अशी उपरोधिक टीका  कोल्हे यांनी केली.

नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशिर्वाद घेवून आज करण्यात आली.ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर २८ ऑगस्टला होणार आहे.

Previous articleभाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा 
Next articleमुंबईच्या महापौरांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर