मुख्यमंत्री महोदय, तुमच्यासाठी हा खास फोटो… उघडा डोळे, बघा नीट
मुंबई नगरी टीम
गंगाखेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा धनंजय मुंडे यांनी पुराव्यानिशी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद नाही असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला उत्तर म्हणून प्रचंड समुदाय उपस्थित असलेल्या गंगाखेड सभेचा फोटो ट्विट करत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची बोलती बंद केली आहे. खास तुमच्यासाठी हा फोटो… उघडा डोळे, बघा नीट! असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांमध्ये मराठवाड्यातील जनता तुफान प्रतिसाद देत आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सरकारच्या अकार्यक्षमतेवर सडकून टीका करत आहेत. मराठवाड्याचे सुपूत्र आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मुंडे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
आज गंगाखेडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. या सरकारच्या विरोधात कोणी आवाज केला तर ‘ईडी’ लिंबू फिरवले जाते. राज ठाकरे यांनी अमित शाह, मोदींचा पर्दाफाश केला त्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली. राज ठाकरे आघाडी सरकारवरही प्रचंड टीकास्त्र सोडायचे. ईडी तेव्हाही अस्तित्वात होते पण आघाडी सरकारने कधीच नीच राजकारण केले नाही अशी बतावणी त्यांनी केली.गंगाखेड साखर कारखान्यात ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. गंगाखेडच्या लोकांना या साखर कारखान्याच्या मालकाने दिवसाढळ्या लुटले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपेने साखर कारखान्याच्या मालकावर एफआयआर सुद्धा दाखल झाली नाही.भ्रष्ट लोकांना यांचाच आशीर्वाद आहे अशी टीका त्यांनी केली.