३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने ३२ हजार जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. त्यासाठी तब्बल ३२ लाख अर्ज आले. ही आकडेवारीच बेरोजगारीचे भीषण वास्तव दर्शवत आहे. सरकारी नोकऱ्यांची संधी कमी असताना आर्थिक मंदीमुळे खाजगी क्षेत्रातील असलेले रोजगार संकटात आलेले आहेत. नोकरीची आशा लावून बसलेल्या तरुण वर्गासाठी ही चिंतेची बाब असताना सरकार मात्र महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष हटवून अनावश्यक व कमी महत्वाच्या मुद्द्यांवर भर देत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आर्थिक मंदीची झळ महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रालाही बसलेली असून औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी केल्यामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच हे संकट ओढवले असून सरकारने लक्ष घालून या मंदीची झळ कामगारांना बसणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. गेल्या वर्षात देशभरात १.१० कोटी लोकांचा रोजगार गेला असून बेरोजगारीचा दर ७.१ झाला आहे. राज्य सरकारने ३२ हजार जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. त्यासाठी तब्बल ३२ लाख अर्ज आले. ही आकडेवारीच बेरोजगारीचे भीषण वास्तव दर्शवत आहे. सरकारी नोकऱ्यांची संधी कमी असताना आर्थिक मंदीमुळे खाजगी क्षेत्रातील असलेले रोजगार संकटात आलेले आहेत. नोकरीची आशा लावून बसलेल्या तरुण वर्गासाठी ही चिंतेची बाब असताना सरकार मात्र महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष हटवून अनावश्यक व कमी महत्वाच्या मुद्द्यांवर भर देत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आर्थिक मंदीची मोठी झळ वस्त्रोद्योग व वाहन उद्योगाला बसलेली दिसत असून औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड औद्योगीक वसाहतीमधील टाटा, महिंद्रा, बॉश सारख्या मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कपात सुरु केली आहे. टाटा मोटर्समध्येही गणेशोत्सवाच्या तोंडावर आठ दिवस ब्लॉक क्लोजर जाहीर करण्यात आला आहे. याआधीही टाटा कंपनीत असाच ब्लॉक क्लोजर घेण्यात आला होता. नाशिकमधील बॉश कंपनीने आठ दिवस काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या कंपन्यांनीच उत्पादन कपात केल्यामुळे या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांसमोरही मोठे संकट उभे राहिलेले आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणारे वस्त्रोद्योग क्षेत्रही या संकटातून वाचलेले नाही. परिणामी लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची वेळ आलेली आहे.
एवढे मोठे संकट घोंघावत असताना सरकारने त्याकडे वेळीच लक्ष दिलेले दिसत नाही. आतातरी याकडे लक्ष देऊन उद्योग व कामगार यांना आधार द्यावा. महाराष्ट्र सरकारनेही ठोस भूमिका घेऊन या संकटातून मार्ग काढावा तसेच कोणत्याही कंपनीत काम बंद होणार नाही, एकाही कामगाराचा रोजगार जाणार नाही यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे वडेट्टीवर म्हणाले.