एसटीच्या सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदत वाढ
मुंबई नगरी टीम
मुंबई : एसटीच्या सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या सरळसेवा भरती अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विभागाच्या निवड यादी व अतिरिक्त यादीची मुदत संबंधित विभागाच्या निवड व अतिरिक्त यादी वरील अंतिम उमेदवाराची नेमणूक देण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. याचा फायदा सहायक पदातील १६१ उमेदवारांना तसेच लिपिक पदातील १२० उमेदवारांना होणार आहे.
सरळसेवा भरती सन २०१६-१७ अंतर्गत सहायक व लिपिक-टंकलेखक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेतील निवड यादी व अतिरिक्त यादी डिसेंबर २०१८ पर्यंत सेवा निवृत्त होणाऱ्या, आंतरविभागीय बदली तसेच खाते बढतीमुळे रिक्त होणाऱ्या जागा विचारत घेऊन रिक्त पदांच्या संख्येनुसार तयार करण्यात आल्या होत्या. सदर याद्यांची मुदत वाढ ही केवळ एक वर्ष असल्यामुळे, तसेच या काळात विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ बाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश प्राप्त होईपर्यंत सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गात फक्त खुल्या प्रवर्गाच्या रिक्त जागांच्या बढती परीक्षा घेण्यात आल्यामुळे खुला प्रवर्ग वगळता इतर जात प्रवर्गाच्या जागा निर्माण झाल्या नसल्याने सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या निवड यादी वरील बरेच उमेदवार नेमणुकीपासून वंचित राहिले. सदर उमेदवारांच्या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून निवड यादी व अतिरिक्त यादीला मुदत वाढ देण्याचे निर्देश दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळास दिले. त्यानुसार संबंधित विभागाच्या निवड यादीत अंतिम उमेदवारास नेमणूक देण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत निवड यादीची मुदत वाढविण्यात आली आहे.