नवाब मलिकांच्या लढ्यास यश; समीर वानखेडेंची बदली झाल्यावर काय म्हणाले !

मुंबई नगरी टीम

मुंबई । एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना मुदतवाढ न देता त्यांची एनसीबीमधून बदली करण्यात आली आहे.केंद्र सरकारने घेतलेला हा योग्य निर्णय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत वानखेडे यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करून हा विषय धसास लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एनसीबीमध्ये आल्यानंतर फर्जीवाडा करुन समीर वानखेडे यांनी अनेक चांगल्या लोकांना चुकीच्या पद्धतीने तुरूंगात टाकले. वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली.कमी वयात बारचे लायसन्स घेतले ही सगळी प्रकरणे आपण उघड केली.या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, याशिवाय खंडणीच्या प्रकरणात एसआयटी मार्फत तपास सुरू आहे.दिल्ली विजिलिएन्स समितीकडेही तक्रार केल्यानंतर त्यांचेही म्हणणे आले आहे.प्रथमदर्शनी वानखेडे यांनी सर्व्हिस कोडचे उल्लंघन केले आहे हे स्पष्ट होते आहे. या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून हा विषय धसास लावणार असल्याचे मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी म्हणून दिल्लीत भाजपचे नेते दबाव आणत असल्याचे कालच सांगितले होते. त्यानंतर रात्रीच वानखेडे यांची बदली करण्यात आल्याचे समजले.त्यावरून मुदतवाढ मिळावी म्हणून दबाव टाकणा-या व्यक्तीने माघार घेतली हे यावरून स्पष्ट होते आहे.वानखेडे यांना मुदतवाढ दिली असती तर संपूर्ण माहिती घेऊन प्रकरण उघड करणार होतो असेही मलिक म्हणाले.

आर्यन खान प्रकरणात दोन्ही एसआयटी तपास करत आहेत त्यात काही अडचण येत असेल तर त्याचीही विचारणा करण्यात येईल. प्रभाकर साहीलने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे यंत्रणा त्या घटनेचा योग्य तो तपास करुन कारवाई करेल असेही मलिक म्हणाले.जाता – जाता माझ्याबाबतीत वानखेडे यांचा वेगळा प्रकार घडवण्याचा प्रकार होता. पोलिसांकडे माझ्या विरोधात मेलद्वारे तक्रार केली असेल तर माझ्यासह चौकशी करा किंवा माझ्याविरोधात कुठल्या अधिका-याने तक्रार करण्यास कुणाला प्रोत्साहित केले असेल तर त्यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

Previous articleमुंबई बँकेवर प्रविण दरेकरांचे वर्चस्व ; सहकार पॅनेलचा २१ जागांवर दणदणीत विजय
Next articleलाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय