किल्ले लग्न आणि समारंभांसाठी भाड्याने देणार नाही

किल्ले लग्न आणि समारंभांसाठी भाड्याने देणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात एक वर्ग १ आणि दुसरे वर्ग २ चे प्रकारचे किल्ले असून, महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग १ मध्ये येतात आणि अन्य सुमारे ३०० किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात.वर्ग २ चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात.त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत  नसल्याचे स्पष्टीकरण पर्यटन विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील वर्ग २ चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.मात्र हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच या निर्णयाविरोधात राजकीय पक्षांनी सरकारवर चौफेर टिका केल्याने पर्यटन विभागाने याचे खंडन करीत हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही असा खुलासा केला आहे.वर्ग १ चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल असेही स्पष्टीकरणात म्हटले आहे.

Previous articleदिवाकर रावते यांनी एसटीला विकासाच्या मार्गावर आणले : उद्धव ठाकरे
Next articleएमआयएम वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट