दिवाकर रावते यांनी एसटीला विकासाच्या मार्गावर आणले : उद्धव ठाकरे

दिवाकर रावते यांनी एसटीला विकासाच्या मार्गावर आणले : उद्धव ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : एसटी महामंळामध्ये आता विद्युत (इलेक्ट्रीक) बस दाखल होत आहेत. देशातील अशा पहिल्या बसचे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात लोकार्पण करण्यात आले. एकदा चार्ज केल्यानंतर किमान ३०० किमीचा पल्ला गाठणारी ही बस नजिकच्या दोन शहरांमध्ये चालवली जाणार आहे. एसटीमध्ये लवकरच अशा साधारण १५० बसेस दाखल होत आहेत. अशा पर्यावरणस्नेही बसेस एसटी महामंडळात दाखल करण्याची सुरुवात करुन मंत्री  दिवाकर रावते यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. शिवनेरी, शिवशाही आणि विठाई बसच्या यशानंतर आज सुरु करण्यात आलेली विद्युत बस ही ‘शिवाई’ नावाने ओळखली जाईल, अशी घोषणा मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी केली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, पुर्वी राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत हेही लोकांना माहित नसायचे. पण मागील ५ वर्षात मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवासीहिताचे अनेक निर्णय घेत परिवहन विभागाबरोबरच एसटी महामंडळालाही विकासाच्या मार्गावर आणले आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी कोणतीही नैसर्गिक आपत्ती, संकटे यांची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत घेत आहेत. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महामंडळही व्यापक प्रयत्न करत आहे. मागील ५ वर्षात एसटीचा कायापालट झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एसटीच्या अशा विविध कल्पक निर्णयांना नेहमीच प्रोत्साहन देत एसटीच्या विकासात महत्वाचे योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्याविहार येथे एसटी कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थाने बांधण्यात येणार असून तेथील विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळेचा पुनर्विकास केला जाणार आहे. याबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी तेथे अत्याधुनिक शाळा उभारली जाणार आहे. या कामाचे भूमीपूजन यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पात १२ मजली २ इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी ११८ सदनिका असतील.मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयाची इमारत, बसस्थानक व आगाराचीही पुनर्बांधणी करण्यात येणार असून या कामाचे भूमीपूजन यावेळी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी ४९ मजली इमारत उभारण्यात येणार असून त्यातील आठव्या मजल्यापर्यंत पार्कींगची सुविधा असेल. ९ ते १४ व्या मजल्यापर्यंत एसटी महामंडळाचे मुख्यालय असेल. १५ ते ४९ वे मजले शासनाच्या विविध विभागांना भाड्याने देणे प्रस्तावित आहे. त्यातून महामंडळास अंदाजे १६.१७ कोटी रुपये उत्पन्न प्रती महिना मिळू शकेल.

मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी महामंडळामार्फत मागील काही वर्षात व्यापक प्रयत्न करण्यात आले. रिक्षाचे परवाने मुक्त करुन मागील ५ वर्षात सुमारे ३ लाख जणांना बॅज देण्यात आले आहेत. आरटीओ आणि एसटीमध्ये  सुमारे ३८ हजार जणांना थेट नोकऱ्या देण्यात आल्या असून १५ हजार जणांची प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. मागील काळात महामंडळाचा कायापालट करण्याबरोबरच प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यावर भर देण्यात आला. विमानतळालाही मागे टाकतील अशी बसस्थानके निर्माण होत आहेत. चंद्रपूर, वर्धा यापाठोपाठ नाशिक बसस्थानकाचाही आता कायापालट होत आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता पर्यावरणस्नेही अशी विद्यूत बस एसटीच्या सेवेत दाखल होत आहे. यातून प्रदुषणमुक्तीला हातभार लागण्याबरोबरच प्रवाशांनाही एक दर्जेदार सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous articleभगत सिंह कोश्यारी यांनी घेतली मराठीतून राज्यपाल पदाची शपथ
Next articleकिल्ले लग्न आणि समारंभांसाठी भाड्याने देणार नाही