एमआयएम वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट

एमआयएम वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट

मुंबई नगरी टीम

मुंबई : एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जागा वाटपावरून अखेर फूट पडली असून, एमआयएमने आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली.या दोन्ही पक्षातील जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

लोकसभा निवडणूका एकत्रित लढणा-या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममुळे राज्यात कॅांग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता तर काही मतदारसंघात या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी  लाखोच्या घरात मते घेतल्याने विधानसभा निवडणूकीतील जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॅांग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती तर राष्ट्रवादीला विरोध केला होता.लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर आघाडी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. एमआयएमने आंबेडकरांकडे विधानसभेसाठी ९८ जागांची मागणी केली होती.या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात दोन वेळा चर्चा झाली शेवटी एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे ७४ जागांची मागणी करूनही यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही.अखेर आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेवून वंचित बहुजन आघाडीबरोबर फारकत घेण्याची घोषणा करत आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने राज्यात एकूण २४ जागा लढविल्या होत्या.त्यापैकी दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार विजयी झाले होते.

Previous articleकिल्ले लग्न आणि समारंभांसाठी भाड्याने देणार नाही
Next articleकोणत्याही किल्ल्यावर हॉटेल होणार नाही :  माधव भांडारी