कांदीवली पूर्वेतील जनतेची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार
मुंबई नगरी टीम
मुंबई: आकुर्ली रोडच्या अरुंद भुयारी मार्गामुळे होणा-या वाहतुक कोंडीच्या समस्येचा येत्या काही दिवसात अंत होणार आहे. कांदीवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाची वर्क ऑर्डर जारी करण्यात आली असून आठवड्याभरात काम सुरू होईल. नुकतेच या कामाचे भूमीपूजन संपन्न झाले.
आकुर्ली रोडच्या वाहतुक कोंडीच्या समस्येचा कांदीवली पूर्व मधील लोकांना अनेक वर्ष ताप होतो आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी ही समस्या सोडवण्याच्या दिशेने गेली पाच वर्षे जोरदार प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी महींद्रा कंपनी पासून समतानगरपर्यंत जाणा-या पर्यायी डीपी रोडचा मार्ग निर्वेध केला असताना आकुर्ली भुयारी मार्गाची समस्यासुद्धा निर्णायक रित्या संपवली. त्यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रंदीकरणाचा मार्ग प्रशस्थ झाला आहे. नुकतेच अतुल भातखळकर आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी या कामाचे भूमिपूजन केले. वर्क ऑर्डर निघाल्यामुळे काम आठवड्या भरात सुरू होईल. हा भुयारी मार्ग १६ फूटांचा असून याची रुंदी ३३.१० फूट म्हणजे दुप्पटी पेक्षा जास्त होणार आहे. रंदीकरणासाठी २६ कोटी ८३ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून काम ३ वर्षात पूर्ण होईल.
हा अरुंद भुयारी मार्ग वाहतूक कोंडीचे महत्त्वाचे कारण बनला होता. या कामासाठी मेट्रो अथॉरिटीची परवानगी मिळाली आहे. मी मतदारांना दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे, असे यावेळी भातखळकर म्हणाले. अतुल भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यांच्यामध्ये या समस्या सोडवण्यासाठी लागणारी धमकही पुरेपुर आहे, या शब्दात गोपाळ शेट्टी यांनी भातखळकर यांचे कौतूक केले. भूमीपुजनाला कांदिवली पूर्वतील नागरीकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.