अनुदानासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई नगरी टीम
मुंबई : कोल्हापूर, नागपूर, सांगली येथील दिव्यांग आश्रम शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले. मात्र आम्ही गेली १५ वर्षे पाठपुरावा करूनही आमच्या शाळांना अनुदान मिळत नसल्याच्या कारणास्तव आज मंत्रालयात चाळीसगावचे हेमंत पाटील आणि अरूण नेटोरे यांनी मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावरून उड्या मारून आत्महत्त्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या जाळ्यांमुळे त्याचा हा प्रयत्न फसला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
दिव्यांग आश्रम शाळांनाच्या अनुदानासाठी गेली १५ वर्षे पाठपुरावा करूनही शाळांचा कायम अनुदानित हा शब्द वगळत नसल्यामुळे काल मंत्रालयात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे ह्यासंदर्भात बैठक झाली. मात्र तीन शाळा वगळता इतर दिव्यांग आश्रम शाळांना अनुदान मंजूर झाले नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे आमच्या शाळांना अनुदान मंजूर होणार नाही. इतकी वर्षे काम करून अनुदानाअभावी संस्थाचालक पगार देत नाही. त्यामुळे आम्ही करायचे काय असा सवाल जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे हेमंत पाटील आणि अरूण नेटोरे यांनी उपस्थित केला.याच कारणास्त सांयकाळच्या सुमारास हेमंत पाटील आणि अरूण नेटोरे यांनी मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये ते अडकले यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.या दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलीसांनी जाळ्यात उड्या घेतल्या पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची रवानगी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात केली.
१३०० पेक्षा जास्त शिक्षकांचे पगार आणि थकबाकी मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देण्याचे आदेश २०१६ ला दिले होते. २०१२ ला केंद्र आणि राज्य शासनाने ही योजना सुरू केली होती आणि २०१५ ला आमचे पगार रोखण्यात आले. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो होतो. आश्रम शाळांमधील पटसंख्या बोगस असल्याचे मंत्रालयात अधिकारी सांगतात. केंद्रशासनाकडून अनुदानापोटी १०० कोटींपेक्षा जास्त निधी राज्यसरकारला मिळाले. मात्र राज्यसरकरकडून आमच्या आश्रम शाळांना अनुदान दिले जात नाही, असे हेमंत पाटील आणि अरूण नेटोरे म्हणाले.
जनतेला नुसती आश्वासनेच मिळत असल्याने जनता मंत्रालयात आत्महत्या करण्यासाठी येत आहे हा भाजप सरकारचा नाकर्तेपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. मंत्रालयात संध्याकाळी दिव्यांगाच्या कायम विना अनुदानित शाळांचा ‘कायम’ शब्द काढण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून लढणाऱ्या शिक्षक, संस्थाचालकांनी आज मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि नंतर हेमंत पाटील आणि अरुण नेटोरे यांनी जाळीवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर बोलताना मलिक यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.भाजपाच्या सत्ताकाळात शेतकरी मंत्रालयात येवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. याशिवाय अन्य शेतकर्यांनी न्यायासाठी याच मंत्रालयाचा आधार घेतला आहे.या सरकारच्या काळात कुठलाच घटक समाधानी नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या सरकारला सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे सरकार फक्त निवडणूका कशा जिंकता येतील यासाठी यात्रा काढत आहे असा आरोपही मलिक यांनी केला.