मी उद्या ईडीच्या कार्यालयात जाणार आहे ! कार्यकर्त्यांनी शांतता राखावी
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. काल पत्रकार परिषदेत केलेल्या घोषणेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण उद्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती आज ट्विटरवरून दिली आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी शांतता राखावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांनतर शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेवून शुक्रवारी म्हणजेच २७ सप्टेंबरला आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहून पाहुणचार स्वीकारणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज शरद पवार यांनी ट्विट करून मी उद्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात अधिका-यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे. ईडीच्या कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. ईडी परिसरातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रसासन आणि इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.