पुढचं सरकार युतीचेच ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचे युतीचे स्पष्ट संकेत

पुढचं सरकार युतीचेच ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचे युतीचे स्पष्ट संकेत

मुंबई नगरी टीम

नवी मुंबई : शिवसेना भाजपातील जागा वाटपाचा तिढा अजून कायम असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात दिले आहे.

माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आणि माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंती निमित्त आज नवी मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे वेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक तास उशिराने कार्यक्रम स्थळी पोहचले.त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमात दाखल झाल्यानंतर सर्वांच्या जीवात जीव आला.आगामी विधानसभा निवडणुकीत १३० च्या आसपास जागा द्याव्यात अशी मागणी शिवसेनेची आहे. तर पुणे आदी शहरात काही जागा मिळाव्यात असा आग्रह शिवसेनेचा असल्याने जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने युतीचे भवितव्य अधांतरी असतानाच या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.महायुती माथाडी कामगारांच्या पाठीशी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिलेत. तर उद्धव ठाकरेंनी येत्या निवडणुकीतही युतीचेच सरकार सत्तेत येणार असे विधान करत युतीबाबत सकारात्मक इशारा दिला आहे. आमचे युतीचे सरकार आजही आहे आणि उद्याही असणार, त्यामुळे माथाडी कामगारांचे प्रश्न आमच्या सरकारकडून सोडवेल जातील असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्याची निवडणूक आम्ही जिंकणार, महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणारच असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Previous articleशरद पवारांवरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही
Next articleमी उद्या ईडीच्या कार्यालयात जाणार आहे !  कार्यकर्त्यांनी शांतता राखावी