`आणि ….अजित पवार यांना अश्रू अनावर झाले !
मुंबई नगरी टीम
मुंबई : आमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेवून राजीनाम्याचे कारण सांगितले. शिखर बॅंकेचे सदस्य नसतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाव यामध्ये गोवले गेले त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो, व्यथित झालो त्या उद्विग्नेतून राजीनाम्या दिल्याचे स्पष्ट करत असतानाच अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. भावूक झालेल्या पवारांनी अश्रू पुसतच शरद पवार यांच्याबाबत आदर व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार काल आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या राजीनाम्याबाबत गुढ वाढत होते. त्यानंतर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत खुलासा केला. त्यांनतर आज अजित पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेवून चर्चा केली. त्यांनतर अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेवून याबाबत खुलासा केला. काल मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन विधानसभा अध्यक्ष हरिबाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. त्यामुळे माझ्या वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वेदना झाल्या. मी त्यांच्याशी चर्चा न करता राजीनामा दिला. यापूर्वीही असाच प्रसंग झाला होता असेही अजित पवार यांनी सांगितले.शिखर बॅंकेचे शरद पवार हे सभासद नव्हते त्यांचा दुरान्वये संबंध नसताना त्यांचे नाव या प्रकरणात गोवले गेले. हा निव्वळ बदनामीचा डाव असून, या सगळ्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो, व्यथित झालो असे पवार यांनी स्पष्ट केले. हे बोलत असतानाच अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. अश्रू पुसतच त्यांनी शरद पवार यांच्याबाबत आदर व्यक्त केला.
शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत त्यामुळे ते सांगतील तसे वागणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. शिखर बँक प्रकरणात अजित पवार यांचे नाव गोवले गेले आहे. माझे नाव नसते तर हे प्रकरण पुढेच आले नसते असा दावाही अजितदादांनी केला.शिखर बॅंकेत १२ हजार कोटींच्या ठेवी होत्या तर २५ हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा असा सवालही त्यांनी केला.ही घटना २०११ ची असताना निवडणुका आल्यावरच यांना या गोष्टी का आठवतात. असेही पवार म्हणाले.