विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे प्रबळ दावेदार
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाचे दावे फोल ठरवत राज्यातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवत राज्यात एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संधी दिली असतानाच विधानपरिषदेत सत्ताधा-यांना धारेवर धरणारे आक्रमक विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे विधानसभेत सत्ताधा-यांची कोंडी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विधानपरिषदेतील अनुभवाच्या जोरावर मुंडे यांना राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या दोन पक्षांनंतर राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाणार हे स्पष्ट आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अनेक दिग्गज निवडून आले आहेत. त्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांचा समावेश आहे. मात्र राज्यातील जनतेने दिलेला कौल पाहता या नेत्यांकडे पक्ष बांधणीची जबाबदारी दिली जावू शकते.विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीत अनेक जण स्पर्धेत असले तरी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. त्यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत भाजपाच्या अनेक मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली होती. विरोधी पक्षनेते म्हणून मुंडे यांनी आक्रमकपणे जबाबदारी सांभाळल्याने त्यांचा हा अनुभव पाहता त्यांचे नाव या स्पर्धेत सर्वात पुढे आहे.