राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार

राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे अजित पवार हे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे नेते असतील.त्यांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला त्याला राष्ट्रवादीच्या आमदारांनी अनुमोदन दिले.

 राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली.या बैठकीत अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला. त्याला आमदार नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार याची निवड झाल्याने ते विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील  नेते असतील. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर टीका केली. पक्ष बदलून नाही तर मन बदलून लोकांची मते जिंकायची असतात असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर जनतेला मान्य नाही हे त्यांनी दाखवून दिले असे ते म्हणाले.कमी जागा लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. पक्षाला नवी ऊर्जा देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. मोदी आणि शाह यांनी ३७० कलमाचा मुद्दा महाराष्ट्रात प्रचारादरम्यान रेटला मात्र,आम्ही जनतेचे मुद्दे मांडले असेही पाटील म्हणाले.

Previous articleशिवसेनेला सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा
Next articleशिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर ?