शेतक-यांनो खचून जाऊ नका ; शिवसेना तुमच्या पाठीशी
मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : राज्यातील विविध भागात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कायम दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील शेतक-यांनाही या पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून येथिल बळीराजाला दिलासा दिला.शेतक-यांनो खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देतानाच राज्यात आपले सरकार येणार आहे. त्यामुळे मी दिलेल्या वचनानुसार तुमचा सातबारा कोरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथिल शेतक-यांच्या बांधावर जावून त्यांनी शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या.मुंबईत बसून देखील मला ही परिस्थिती समजली असती पण तुम्हाला धीर देण्यासाठी येथे आलो आहे. टीव्ही कॅमेरा घेवून नाटक करायला नाही आलो नाही. शेतकरी ऊन वारा पाऊस न पाहता अन्न पिकवतो. जो अन्नदाता आहे तो उपाशी राहतोय ही परिस्थिती आपले वैभव होऊ शकत नाही.राज्यात आपले सरकार आल्यानंतर जसे मी तुम्हाला वचन दिले होते त्याप्रमाणे तुमचा सातबारा कोरा करेन ते वचन मी पूर्ण करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.राज्यातील परिस्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी करून राज्य सरकारने काल जाहीर केलेली १० हजार कोटीची मदत अपुरी असल्याचे सांगितले. नुकसान भरपाई देताना पंचनामे चौकशा न करता सर्वांना मदत करावी असेही ते म्हणाले,
शेतकऱ्यांना दिलासा देताना उद्धव ठाकरे म्हणाले,मी तुम्हाला न्याय देण्यासाठी आलेलो आहे. आत्महत्या हा विचारसुद्धा मनात आणायचा नाही याचे वचन मला तुमच्याकडून हवे आहे. मला जितके शक्य आहे तितके मी सर्व करेनच. माझी ताकत तुम्ही आहात शक्ती आहात आणि तुम्ही जर आत्महत्या केली तर हे चालणार नाही. जे धाडस तुम्ही शेतकरी करता ते धाडस बाकी कोणी करत नाही. केंद्र सरकारला या महाराष्ट्राने भरपूर दिलेल आहे. महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त मदत आणण्याचा मी प्रयत्न करीन. मी तुम्हाला सोबत द्यायला आलेलो आहे, तुम्हाला साथ द्यायला आलेलो आहे. तुम्ही माझे कुटुंब आहात आत्महत्या करायची नाही असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना केले.