मुनगंटीवारांची गोड बातमी म्हणजे “शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार”

मुनगंटीवारांची गोड बातमी म्हणजे “शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार”

मुंबई नगरी टीम

मुंबई : सत्ता स्थापनेचा तिडा कायमच असून,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात महायुतीचेच सरकार येणार असून, लवकरच गोड बातमी समजेल असे संकेत दिले असतानाच मुनगंटीवार यांची गोड बातमी म्हणजे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आज झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतनंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगत राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा केला. मुनगंटीवार यांच्या या घोषणेनंतर त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले. राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा भाजपा करणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन केले पाहिजे असे सांगून,भाजपा राज्यपालांना भेटून १४५ आमदारांची यादी देणार असेल तर ती आनंदाची बाब असल्याचे राऊत म्हणाले.भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले असले तरी राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा राऊत यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी समजेल असे म्हणाले आहेत. ती गोड बातमी म्हणजे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे राऊत म्हणाले.राऊत यांच्या या दाव्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट होत असल्याने भाजपा लवकरच अल्पमतातील सरकार स्थापन करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Previous articleराज्यात महायुतीचेच सरकार येणार : मुनगंटीवार
Next articleदुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणा-या सवलती ओल्या दुष्काळातही द्याव्यात