महापोर्टल सेवा बंद करून पुर्वीप्रमाणेच परीक्षा घ्या : खा. सुप्रिया सुळे
मुंबई नगरी टीम
मुंबई : दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल सेवा बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली.दिव्यांगाच्या २०१६ सालच्या कायद्यामुळे २१ प्रकारच्या दिव्यांग प्रकारांना सामावून घेण्यात आलं आहे. त्यामुळे दिव्यांगांबाबतच्या कामाची व्याप्ती वाढली आहे.यामुळेच इतर काही राज्यांमध्ये दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली.शिवाय मागील शासनाने नोकरभरतीसाठी महापोर्टल सेवा सुरू केली होती. मात्र या सेवेत पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या लाखो युवकांना ही सेवा मदत ठरण्याऐवजी अडचण ठरत आहे. त्यामुळे युवकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सेवा बंद करून पुर्वीप्रमाणेच परीक्षा पद्धत ठेवावी अशी मागणी करणारे निवेदनही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.दिव्यांगाच्या व महापोर्टल सेवा बंद करावी या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वेळ मागितली होती. त्यांनी वेळ देऊन म्हणणे ऐकून घेतले त्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.