मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या रिंगणात !
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडुन गेल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या २४ जानेवारीला निवडणुक होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.रिक्त झालेल्या एका या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली.विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे परळी मतदार संघातुन विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या २४ जानेवारीला मतदान होणार आहे.या रिक्त झालेल्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवारी हे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार असल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात कोणत्याही एका सभागृहात निवडुन येणे आवश्यक असल्याने ते हि पोटनिवडणुक लढवतील अशी चर्चा आहे.मंत्री धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत होती.विधानसभेतील पक्षिय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार सहज विजय प्राप्त करू शकतो.
केंद्रीय निवडणुक आयोगाने आज केलेल्या घोषणेनुसार या पोटनिवडणुकीची अधिसूचना येत्या ७ जानेवारीला जारी करण्यात येणार आहे. १४ जानेवारी हि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून,१५ जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल.तर १७ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.एका पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास २४ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येईल.
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणूक ३१ जानेवारीला
राज्यातील यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी ३१ जानेवारी २०२० ला पोटनिवडणूक घेण्यात येणार असून ४ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने आज यवतमाळ विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यवतमाळ विधान परिषदेच्या जागेसाठी ३१ जानेवारी २०२० ला मतदान घेण्यात येणार आहे. ७ जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी असून १५ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छानणी होईल. १७ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर ४ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.यवतमाळ विधानपरिषद सदस्यपदाची कालमर्यादा ५ डिसेंबर २०२० पर्यंत आहे.
विधानसभेतील पक्ष बलाबल पुढील प्रमाणे- शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४,कॅाग्रेस ४४,भाजप १०५, बहुजन विकास आघाडी ३,समाजवादी पक्ष २, एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मा), शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १,राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १, अपक्ष १३.