मुलीच्या बनावट पासपोर्टमुळे एजाज लकडावाला पोलीसांच्या जाळ्यात
मुंबई नगरी टीम
मुंबई : कुख्यांत गुंड एजाज लकडावाला याला काल रात्री पाटणा शहरातून अटक करण्यात आली.मात्र आपली मुलगी शिफा शेख हिच्या बनावट पासपोर्टमुळे तो पोलीसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
कुख्यांत गुंड एजाज युसुफ लकडावाला याला काल रात्री पाटणा शहरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.एका मोठ्या गँगस्टरला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी पोलीसांचे अभिनंदन केले.गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याच्यावर खंडणीचे सुमारे २५ एफआयआर दाखल आहेत.त्याचबरोबर इतर ८० केसेस दाखल असून मोकाचे ४ खटले दाखल आहेत. छोटा राजन हा दाऊद इब्राहीमबरोबर सहभागी असताना लकडावाला त्याच्यासोबत होता. छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर लकडावाला हा छोटा राजनसमवेत काम करु लागला. २००८ मध्ये छोटा राजनपासून विभक्त होऊन तो स्वतंत्रपणे ऑपरेट करु लागला. त्याच्यावर खंडणी, मोकासारखे विविध खटले दाखल आहेत.
पोलीसांच्या प्रयत्नातून काल पाटणा येथून त्याला अटक करण्यात यश आले,अशी माहिती त्यांनी दिली.शिफा शेख ही लकडावालाची मुलगी आहे. तिने वडिलांचे नाव मनिष अडवाणी असे दाखवून बनावट पासपोर्ट बनवला होता.तिला पासपोर्ट ॲक्टनुसार अटक करण्यात आली.तेथून लकडावालाच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि पोलीसांच्या प्रयत्नातून लकडावालाला काल रात्री अटक करण्यात यश आले, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.