२८ सहाय्यक प्राध्यापकांची सेवा ई-सेवार्थ करण्याचा निर्णय लवकरच : मंत्री उदय सामंत

२८ सहाय्यक प्राध्यापकांची सेवा ई-सेवार्थ करण्याचा निर्णय लवकरच : मंत्री उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई : औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सन २००५ ते २०१० या कालावधीतील पदभरती केलेल्या २८ सहाय्यक प्राध्यापकांची सेवा ई-सेवार्थ करण्याबाबत शासन सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.

विधानभवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरतीप्रक्रियेतील सहाय्यक प्राध्यापक यांचे ई-सेवार्थ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार डॉ.राहूल पाटील उपस्थित होते.ज्या प्राध्यापकांची भरती प्रक्रिया होऊन अनेक वर्ष होऊन गेली तरी त्यांना ई-सेवार्थमध्ये का घेतले नाही याचा तपास करावा. तसेच याबाबत काही न्यायालयीन प्रकरण आहे का हे ही तपासावे. प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविताना शासनाची पदाला मान्यता, बिंदू नामावली या सर्व बाबींची पूर्तता केली आहे का याचा एकत्रित अहवाल तयार करुन पुढील १५ दिवसात पुन्हा आढावा बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच चांगल्या शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी समांतर विद्यापीठासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेता येईल का यासाठी एक समिती तयार करावी. या समितीने इतर देशातील समांतर विद्यापीठ त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करुन राज्यातील चांगल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समांतर विद्यापीठांसंदर्भात एक धोरण तयार करावे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

Previous articleसदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फू. करण्याची अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleप्रशासनात मोठे फेरबदल; तब्बल २२ सनदी अधिका-यांच्या बदल्या