मंत्रालयात येणा-या जनतेचा वेळ वाचविण्यासाठी काँग्रेसचा “लोकदरबार”

मंत्रालयात येणा-या जनतेचा वेळ वाचविण्यासाठी काँग्रेसचा “लोकदरबार”

मुंबई नगरी टीम

मुंबई : आपल्या विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचविण्यासाठी दर बुधवारी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात लोकदरबारचे आयोजन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, विशेषतः मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यातही एखादी शासकीय बैठक लागल्यास मंत्र्यांना त्यासाठी जावे लागते व लोकांचा अधिक वेळ खर्ची पडतो. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी मी स्वतःच दर बुधवारी दुपारी ३ वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टिक एमएलए हॉस्टेलच्या मागे, रिगल सर्कलजवळ, कुलाबा, मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे ठरवले आहे.पहिला लोकदरबार उद्या बुधवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामुळे लोकांना आपली निवेदने देण्यासाठी निश्चित जागा व वेळ उपलब्ध होऊ शकेल, तसेच त्यांचा वेळ आणि श्रमही वाचतील. हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असल्याने याला लोकदरबार असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleइंग्रजी माध्यमांच्या शाळांना दणका ; मराठी विषय होणार सक्तीचा
Next article“त्या” व्हिडिओशी भाजपाचा संबंध नाही : चंद्रकांत पाटील