२६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय संविधानाची पुरेशी माहिती आणि संविधानातील मुलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये “सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे” या उपक्रमाअंतर्गत दररोज संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्य घटना स्वीकारण्यात आली.या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.तर २६ जानेवारी १९५० पासून संविधान अंमलात आले आहे.भारतीय राज्य घटनेतील मुलतत्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि घटनेतील न्याय,स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक असल्याने राज्यातील प्रत्येक शाळेत दररोज परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समुह वाचन करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र त्यांची अंमबजावणी होत नसल्याने येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यामिक शाळांमध्ये “सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे” या उपक्रमाअंतर्गत दररोज परीपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.यासंदर्भात राज्य सरकारने मंगळवारी शासन निर्णय जारी केला आहे.