जेव्हा राज्यपाल शपथविधी सोहळ्यात संतप्त होतात तेव्हा….

जेव्हा राज्यपाल शपथविधी सोहळ्यात संतप्त होतात तेव्हा….

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. यावेळी शपथ घेताना ज्येष्ठ मंत्र्यांनी शपथेतील मजकूरा व्यतिरिक्त अन्य मनोगत व्यक्त करित महापुरूषांच्या नावांचा उल्लेख केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती.मात्र आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात काही मंत्र्यांनी तोच कित्ता गिरावल्याने राज्यपाल संतापलेले दिसत होते. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत काँग्रेसचे नेते के. सी.पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली.

शिवतीर्थावर झालेल्या ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात जयंत पाटील,छगन भुजबळ,नितीन राऊत,बाळासाहेब थोरात सुभाष देसाई आदी मंत्र्यांनी शपथ घेताना लिहिलेल्या शपथेतील मजकूराच्या बाहेर जाऊन महापुरूषांची नावे घेवून मनोगत व्यक्त केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून शपथविधी सोहळ्यापूर्वी शपथ घेणा-या मंत्र्यांना याबाबत सूचनाही देण्यात आल्या होत्या. सुरूवातीला काही मंत्र्यांनी शपथेतील मजकूराप्रमाणे शपथ घेतली. मात्र राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतल्यानंतर जय सीमाभाग महाराष्ट्र..जय महाराष्ट्र असे मनोगत व्यक्त करताच राज्यपालांनी मुश्रीफ यांच्याकडे पाहिले.त्यानंतर हा प्रकार थांबाबा म्हणून संबंधित अधिका-यांना सूचना देण्यात आल्या.काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आल्या त्यांनी शपथ घेण्यासाठी सुरूवात करताना संविधानाचे शिल्पकार..असे उच्चारताच राज्यपालांनी शपथ घेताना मागे पुढे कसलाही उच्चार करायचा नाही अशी ताकिद दिली. त्यांनतर वर्षा गायकवाड यांनी मजकूराप्रमाणे शपथ घेतली.

अवांतर मनोगत व्यक्त करून नका अशा सूचना राज्यपालांनी अधिका-यांमार्फत पुढे शपथ घेणा-या नेत्यांना दिल्या.त्यानंतर शपथ घेण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे नेते डॅा. राजेंद्र शिंगणे यांनी शपथ घेतल्यानंतर जय जिजाऊ..असे म्हटले. त्यावेळी राज्यपालांनी शेजारी बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत बातचीत केली.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका अधिका-यामार्फत असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून शपथ घेणा-या पुढील नेत्यांना सूचना केल्या.त्यांनतर शपथ घेण्यासाठी आलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर जय सेवालाल असे म्हटले.तर त्यांनतर शपथ घेताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शपथेपूर्वी शाहू,फुले,आंबेडकर आदी महापुरूषांची नावे घेत शपथ घेण्यास सुरूवात केली तेव्हा आव्हाड यांना राज्यपालांनी टोकले यातच त्यांनी आपली शपथ पुर्ण केली.या सर्व प्रकारामुळे राज्यपाल संतप्त झाल्याचे स्पष्ट दिसत होते.काँग्रेसचे नेते के. सी.पाडवी यांनी शपथ घेताना शपथेतील मजकूरानंतर निसर्ग आणि मानवता वादाला नतमस्तक होवू, आणि मला ज्यांनी 9 वेळा निवडून दिले त्यांना वंदन असे मनोगत व्यक्त केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कमालीचे संतप्त झाले.असे चालणार नाही असे सुनावत,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे बसले आहेत त्यांनी परवानगी दिली तर हे मान्य करतो,अशा शब्दात कान टोचत त्यांनी पाडवी यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली.

आज घडलेल्या शपथविधी सोहळ्यातील या प्रकारामुळे राज्यपाल चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र होते.पडवी यांच्या प्रकारानंतर हा प्रकार थांबेल असे वाटत होते.पण राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास आलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शपथ घेतल्यानंतर जय जवान जय किसान असा नारा दिला.राष्ट्रवादीचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शपथेनंतर जय भिम जय महाराष्ट्र असे म्हटल्यानंतर राज्यपालांनी चक्क हातच जोडले.शपथविधी वेळी घडलेला हा प्रकार आणि संतप्त झालेले राज्यपाल हा शपथविधी सोहळ्यातील चर्चेचा विषय बनला होता.

Previous articleविस्तारात केवळ तीन महिला मंत्र्यांचा समावेश
Next articleम्हणून शिवसेनेने कोकणातून उदय सामंतांना दिली संधी