म्हणून शिवसेनेने कोकणातून उदय सामंतांना दिली संधी

म्हणून शिवसेनेने कोकणातून उदय सामंतांना दिली संधी

मुंबई नगरी टीम

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तारात शिवेसेनकडून कोकणातील रत्नागिरीचे आमदार उदय सामंत,भास्कर जाधव,सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर,रायगडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पैकी कोणाला संधी दिली जाईल याकडे सर्व कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कोकणातून केवळ रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनाच मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करणारे आणिु तरूणांमध्ये लोकप्रिय असणारे उदय सांमत यांच्या माध्यमतुन शिवसेना वाढीसाठी शिवेसना नेतृत्वाने सामंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची जिल्ह्यातील कामगिरी पाहता त्यांची विस्तारात वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते.त्यांच्यासह दीपक केसरकर किंवा भास्कर जाधव यांच्यापैकी एका नेत्याला मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशीही शक्यता होती.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राजकीय शह देण्यासाठी केसरकर यांना संधी दिली जाईल अशी चर्चा असतानाच केसरकर यांना या विस्तारात स्थान देण्यात आले नाही.त्यांच्या ऐवजी कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांचीही या विस्तारात वर्णी लागली नाही.रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व १२ जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत.पंचायत समितीच्या २० जागांपैकी १८ जागा शिवसेनेकडे आहेत.माजी राज्यमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि सलग चौथ्यांना आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी झालेले आमदार उदय सामंत यांना शिवसेनेने कोकणात पक्ष संघटना वाढीसाठी मोठी संधी देत कॅबिनेटमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे.

आज झालेल्या रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपाने आपली सर्व ताकद लावली असतानाही शिवसेना उमेदवार प्रदिप (बंड्या) साळवी हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.या विजयात मंत्री उदय सामंत यांचा मोलाचा वाटा आहे. तरूण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे आणि सामंत यांच्याकडे असणा-या उपनेतेपदाच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी मोठे बळ दिले आहे.उदय सामंत यांना मंत्रीपदाची संधी दिल्यास रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटनेला मोठे बळ मिळून तरूणांची फौज शिवसेनेच्या पाठिशी उभी राहिली याचा विचार करून पक्ष नेतृत्वाने सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. सामंत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देतानाच त्यांच्याकडे रत्नागिरीचे पालकमंत्रीपद दिले जाणार आहे.शिवसेनेने उदय सामंत यांच्यासारख्या युवा नेतृत्वाकडे मोठी जबाबदारी सोपविल्यामुळे राज्यात आणि विशेषत: कोकणात शिवसेना वाढीसाठी मोठा हातभार लागेल, असे कोकणातील तरूण कार्य़कर्ते सांगत आहेत.

Previous articleजेव्हा राज्यपाल शपथविधी सोहळ्यात संतप्त होतात तेव्हा….
Next articleराष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचे “बंड झाले थंड”