राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचे “बंड झाले थंड”

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचे “बंड झाले थंड”

मुंबई नगरी टीम

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील नाराजी उफाळून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना डावलल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.पक्षातील नेत्यांमध्ये असणारी नाराजी दुर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोळंके यांना आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात बोलावले होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यांनतर त्यांची नाराजी दुर झाली.मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडुन आलो आहे.सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मला पक्षाने न्याय द्यावा अशी माझी भूमिका होती.परंतु मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देवून, राजकारणातू निवृत्ती घेण्याचा विचार केला.या निर्णयानंतर माझे कार्यकर्त्यांनी भेटून असा निर्णय घेवू नये अशी विनंती केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आज माझी चर्चा झाली. त्यामुळे माझे समाधान असून,राजीनाम्याचा निर्णय मागे घेत आहे असे आमदार सोळंके यांनी सांगितले.

आमदार सोळंके नाराज असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर आज त्यांना मुंबईला बोलावण्यात आले.त्यांच्यासोबत आम्ही आज चर्चा केली आहे. राष्ट्रवादी पक्ष एका कुटुंबाप्रमाणे असून,कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा मान ठेवणे,त्याला काम करण्याची संधी देणे हे शरद पवार यांचे धोरण आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याशी चर्चा केली असल्याने आमदार सोळंखे यांचे समाधान झाल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Previous articleम्हणून शिवसेनेने कोकणातून उदय सामंतांना दिली संधी
Next articleशिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली