दोन वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करणार

दोन वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : दादरच्या इंदू मिल येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.आज त्यांनी दादरच्या इंदू मिल येथे भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

डॉ.आंबेडकरांसारख्या महामानवाचे स्मारक हे भव्यदिव्य तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल,त्याचा नेटकेपणा आणि पावित्र्य राखले जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अजित पवार यांनी राज्यातील विविध विकासकामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.त्यासंदर्भात त्यांनी आज इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकस्थळाला भेट दिली.यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी स्मारकाची सद्यस्थिती व आराखड्यासंदर्भात माहिती घेतली.स्मारकाच्या कामातील बारकावेही समजून घेतले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या.डॉ.स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून,या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार आहे.सर्व अडचणी दूर करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल.राज्य सरकारच्या अख्त्यारित सर्व परवानग्या असल्याने त्या मिळण्यात अडचण येणार नाही.स्मारकाच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही, त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करु असे सांगतानाच,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्मारकाचे दरवाजे हे उंच असले पाहिजेत.स्मारकाचा नेटकेपणा जपला गेला पाहिजे. स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या पायांना चटके बसू नये याची काळजी घ्यावी.त्यासाठी आतापासूनच वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यावा.समुद्राच्या खाऱ्या हवेचा स्मारकावर दुष्परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा अनेक सूचना त्यांनी केल्या.यावेळी मंत्री नवाब मलिक, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव,स्मारकाचे वास्तूविशारद तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleदालनाची प्रतिक्षा न करता मंत्री उदय सामंत यांचा आढावा बैठकांचा धडाका !
Next articleपोलीस दलाला सर्वोत्तम प्रशिक्षण,अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देणार : मुख्यमंत्री