दालनाची प्रतिक्षा न करता मंत्री उदय सामंत यांचा आढावा बैठकांचा धडाका !

दालनाची प्रतिक्षा न करता मंत्री उदय सामंत यांचा आढावा बैठकांचा धडाका !

मुंबई नगरी टीम

मुंबई : सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तारात एकूण ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली.या शपथविधी सोहळ्यानंतर अनेक मंत्र्यांनी आपल्या मतदार संघात जाऊन सत्कार सोहळ्यांना हजेरी लावली असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे कोकणातून मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळालेले आणि धडाकेबाज निर्णयासाठी परिचित असलेले उदय सामंत यांनी दालन,बंगला वाटपाची वाट न पाहता जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढील दोन दिवसांचा कार्यक्रम आखून विविध बैठकांचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्र्यांना शपथ देण्यात आली.मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून कोकणातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी लॅाबिंग केले.रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेच्या दोन नेत्यांना विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यता होती. त्यानुसार भास्कर जाधव,दीपक केसरकर आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या नावाची चर्चा होती.मात्र पक्ष नेतृत्वाने कोकणात पक्ष वाढीसाठी झटणारे आणि निर्णय घेण्यात धडाकेबाज समजले जाणारे उदय सामंत यांना मंत्रिमंडळात कॅबिनेच मंत्री म्हणून संधी दिली.एकिकडे अनेक मंत्र्यांनी शपथविधी उरकताच आपापल्या मतदार संघात जाऊन सत्कार सोहळ्यांना हजेरी लावली असतानाच मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात मिळणा-या मंत्री दालनाची आणि बंगल्याची प्रतिक्षा न करता आपल्या निवडक अधिका-यांना सोबत घेवून,रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नासह,मुबंई गोवा महामार्ग आढावा बैठक आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढील दोन दिवस बैठकांचे आयोजन केले आहे.यासाठी त्यांनी मंत्री दालनाची वाट न पाहता विधानभवनतील परिषद सभागृहात या बैठकांचे आयोजन केले आहे.

मतदारांचा आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री सामंत यांनी उद्या गुरूवारी दिनांक २ जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्हा नियोजन आढावा बैठक,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पाणी पुरवठा आढावा बैठक,रत्नागिरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आढावा बैठक,तिवरे धरण आढावा बैठक,माचाल,लांजा तालुका आढावा बैठक,गणपतीपुळे आढावा बैठक अशा विविध बैठकांचे आयोजन  विधानभवनील परिषद सभागृहात करण्यात आले आहे.सकाळी सुरू होणा-या बैठका संध्याकाळ पर्यंत चालणार आहे.तर शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजीही त्यांनी महत्वाच्या बैठकांचे आयोजन केले आहे.रत्नागिरी म्हाडा प्रकल्प,रत्नागिरी पोलीस हाऊसिंग सोसायटी,या बैठकांसोबतच कोकणातील प्रलंबित असणा-या महत्वाच्या मुबंई गोवा महामार्ग आढाव्यासाठी बैठक आयोजित केली आहे.दुपार नंतर रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आढावा,रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणा आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.विधानभवनातील परिषद सभागृहात होणा-या या आढावा बैठकांमध्ये विशेषत: कोकणातील प्रश्नांवर भर देण्यात आले आहे.मंत्रिमंडळाचा विस्तार होताच मंत्रालयातील दालनाची प्रतिक्षा न करता मंत्री उदय सामंत यांनी खाते वाटपाची वाट न पाहता कोकणातील प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठकांचा धडाका लावत आपल्या कामाची जोरदार सुरूवात केली आहे.

Previous articleमातंग समाजाला शिवसेनेकडून न्यायाची अपेक्षा ; धनराज थोरात 
Next articleदोन वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करणार