राज्यातील रस्त्यांची कामे ठरलेल्या वेळेत व्हायला हवीत : अशोक चव्हाण
मुंबई नगरी टीम
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते, इमारती, पूल आदी कामे ठरलेल्या वेळेत व्हावीत. तसेच त्या कामांचा दर्जा यावर पुढील काळात जास्त भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात विभागाची आढावा बैठक घेतली.सार्वजनिक बांधकाम विभागाची रचना, विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रस्ते, शासकीय इमारती, पुल आदी कामांची सद्यःस्थिती, पुढील काळात राबविण्यात येणारे उपक्रम आदींची माहिती यावेळी देण्यात आली.
मंत्री चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी रस्त्यांची कामे करताना ती ठरलेल्या वेळेत व्हायला हवीत. तसेच या रस्त्यांचा दर्जा राखला जावा. यासंबंधी जबाबदारी निश्चित केली जावी. रस्त्यांच्या निर्मितीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. महामार्गाबरोबरच शहरांमधील विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची कामेही सुरु करावीत. वारंवार खराब होणारे रस्ते हे सिमेंट काँक्रिटने बनवावेत. पथकरातून रस्त्यांची कामे करताना त्या रस्त्यावर येणाऱ्या गावांतील रस्त्यांच्या कामाचा समावेश त्यामध्ये करावा. जेणेकरून त्या मार्गावरील गावातील रस्ते उत्तम होतील. रस्त्यांसाठी भूसंपादन केलेल्यांचे पैसे तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.शासकीय इमारती उत्तम व्हाव्यात, खासगी इमारतींप्रमाणेच त्या सुंदर दिसाव्यात, यासाठी त्याचा आराखडा, नियोजन यासाठी विभागातील वास्तुरचनाकारांची स्पर्धा घ्यावी. यासाठी खासगी वास्तुरचनाकारांचीही मदत घेता येईल. राज्यातील विविध निवडणुकीला उभारणाऱ्या उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, अशी सूचनाही चव्हाण यांनी यावेळी केली.