मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात घडणाऱ्या अनुचित प्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा. एकंदर राज्याचा कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गैरवर्तनाची नेमकी मानसिकता कशामुळे होत आहे याबाबतीत सविस्तर आढावा घ्यावा,असे अनुचित प्रकार थांविण्यासाठी एक कार्यक्रम अथवा कृति आराखडा बनवून एक जरब निर्माण करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टी समाजात होणार नाहीत असे आवाहन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
समाजात अनेक अनुचित प्रकार घडत आहेत आधी जालना आणि मग वर्धा येथिल हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला. यामुळे राज्यातली कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न जनतेच्या मनात उभा राहिला असतानाच आता सिल्लोड या ठिकाणी एका २६ वर्षीय महिलेला जाळण्याचा प्रयत्न तर, मीरारोड येथे अशीच मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. सरकारने हे विषय अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे.विनयभंग, जाळपोळ असे प्रकार राज्याला भूषणावह नाहीत. यावर तातडीने दखल घेऊन पोलीस प्रशासनाचा एक धाक याठिकाणीनिर्माण होणे आवश्यक आहे. समाजात असे अनुचित प्रकार पुन्हा होणार नाही असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची आणि प्रशासनाची असावी असे ठाम प्रतिपादन दरेकर यांनी केले.