मुंबई नगरी टीम
मुंबई : स्त्रियांवरील वाढते अत्याचार रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे किंवा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावरील चर्चेसाठी एक दिवस स्वतंत्र राखीव ठेवावा,अशी मागणी माजी मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला एकतर्फी प्रेमातुन पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार विकेश नगराळे या विकृत माथेफिरूने केला. ही शिक्षिका नागपूरात मृत्युशी झुंज देत आहे.यवतमाळ जिल्हयातील महागाव परिसरात एका महिलेला विवस्त्र करून तिचा शिरच्छेद केल्याची घटना घडली आहे.मीरारोड येथे अशीच मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे.यावरून आता विरोधी पक्षाने सत्ताधा-यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.राज्यात स्त्रियांवर मोठया प्रमाणावर अत्याचार होत आहे. एकतर्फी प्रेमातुन महिलांना जिवंत जाळणे,बलात्कार, खुन अशा पध्दतीच्या घटना सातत्याने महाराष्ट्राने घडत आहेत.सरकारने याकडे गांभीर्यपूर्वक दृष्टीकोन ठेवून कारवाई करणे आवश्यक आहे. जेणेकरून स्त्रियांवरील वाढते अत्याचार कमी होतील.या विषयासंदर्भात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे किंवा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एक दिवस स्वतंत्रपणे या विषयावर चर्चेसाठी राखीव ठेवावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मागणी केली आहे.