मुंबई नगरी टीम
मुंबई: भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला असला तरी याचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा यासंदर्भात कायदेविषयक सल्ला घेवून पावले उचलली जातील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली.या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हि माहिती दिली.भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली.केंद्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असला तरी याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे असे सांगून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.कलम ६५ नुसार केंद्राला एनआयएकडे तपास देण्याचा अधिकार आहेत. परंतु याबाबत केंद्राने राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवे होते. कलम १० नुसार समांतर चौकशी करण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे असतो. त्यामुळे कायदेविषयक सल्ला घेतल्यानंतर भीमा कोरेगाव आणि एल्गार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची पावले उचलली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत परंतु भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास वेगळा कसा व्हायला हवा याचा विचार सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली.आज झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी या प्रकरणाची जाहीर वाच्यता करण्याऐवजी जे काही म्हणणं आहे, विचार आहेत ते मांडले जातील किंवा त्याची चर्चा मुख्यमंत्र्याकडे केली जाईल असेही स्पष्ट केले.