तिरंगा वाचवणाऱ्या “त्या” बहाद्दराचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई नगरी टीम

मुंबई : माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणणाऱ्या कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सह्यादी अतिथीगृहात छोटेखानी सत्कार केला.

कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काल ट्वीटरवरून त्यांच्या कर्तव्य भावनेची प्रशंसा केली होती. आज मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाधव यांना सह्याद्रीवर बोलावून घेतले.मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला व शाल, श्रीफळ तसेच शिवाजी महाराजांची प्रतीमा देऊन त्यांना सन्मानीत केले. याप्रसंगी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.

कुणाल जाधव हे जीएसटी भवन येथे शिपाई म्हणून कार्यरत असून, आग लागली तेव्हा ते तळमजल्यावर होते. बचावकार्य सुरू असताना इमारतीवरील तिरंगा तसाच असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी ते जीवाची बाजी लावून पेटत्या इमारतीचे ९ मजले पळत-पळत चढून गेले व तिरंगा सुखरूप खाली आणला. त्यांच्या शौर्याचे सर्वत्र मोठे कौतूक होत आहे.

Previous articleआंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव!
Next articleआता शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे