मुंबई नगरी टीम
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते,तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुरावे मागणारे जन्माला आले असते का ? असा सवाल करतानाच याच मराठी भाषेच्या एका पुत्राने राज्य घटना लिहिली.अन्य एका पुत्राने ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न विचारला. इंग्रजांनाही वठणीवर आणणारी अशी मराठी भाषेची ताकद आहे.मराठी ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे.अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुरावा मागणा-यांनी आपण कोणाकडे पुरावे मागतो आहोत,याचा विचार करायला हवा.ही छत्रपती शिवरायांची भाषा,संत ज्ञानेश्वरांची भाषा आहे. अशा मराठी भाषेचे मूळ शोधायला जाणे म्हणजे तिचा अपमान आहे. अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन अनिवार्य करण्यासाठी आलेल्या विधेकावर बोलताना व्यक्त केल्या.
मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांनी मांडलेल्या या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वराज्याचा राजकारभार कसा करावा, याचा आदेश देणारी ही भाषा आहे. संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानातून जीवनाचे सार याच भाषेत मांडले. ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘मराठी भाषेला अमृतापेक्षा गोड आहे’, असे म्हटले आहे, तर मग मराठी भाषेची सक्ती का करावी लागत आहे ? मराठी भाषेची गोडी आपण विद्यार्थ्यांमध्ये का निर्माण करू शकलो नाही. त्यामुळे आता कायदा करावा लागत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुरावे मागणारे जन्माला आले असते का.याच मराठी भाषेच्या एका पुत्राने राज्यघटना लिहिली. अन्य एका पुत्राने ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ असा प्रश्न विचारला. इंग्रजांनाही वठणीवर आणणारी अशी मराठी भाषेची ताकद आहे. अन्यायाच्या विरोधात तलवार चालवणारी ही भाषा आहे.मराठी भाषा टिकली पाहिजे; मात्र कोण टिकवणार तिला टिकवण्याचे दायित्व आपलेच आहे. शाळेमध्ये इंग्रजी आणि घरामध्ये मराठी,असे बाळासाहेब ठाकरे सांगत आज मला मराठीचे धडे शिकविणारी माझी मला आठवते आहे. इंग्रजांनी आपणावर अतिक्रमण केले; मात्र त्यांच्याकडून आपण चांगले ते घ्यायला हवे आणि वाईटाचा त्याग करायला हवा.मातोश्रीच्या अंगणात आजही तुळशी वृंदावन आहे. सायंकाळी झाली की, या तुळशी वृंदावनात दिवा लागतो. हे आपले संस्कार आपणच जपले पाहिजेत.
मराठी भाषेसाठी आपण एकत्र आलो, तर मराठी भाषेची ताकद संपूर्ण जगाला दाखवून देऊ. त्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी एकत्र आलो, तर महाराष्ट्राची ताकद संपूर्ण जगाला दाखवून देऊ…. मराठी भाषेच्या अस्मितेसाठीच शिवसेनेची निर्मिती झाली आहे. आज शिवसेना प्रमुूखांच्या सोबत काम केलेल्या सुभाष देसाई मराठी भाषेसाठी विधेयक मांडत आहेत. मुख्यमंत्री असतांना हे विधेयक येत आहे, हे भाग्य समजतो असेही मुख्यमंत्री ठाकरे आपल्या भाषणात यावेळी म्हणाले.