‘मराठी भाषा गौरव दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करणार

मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठी भाषा गौरव दिन महाविद्यालये, विद्यापीठात विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भातच्या परिपत्रकाद्वारे सर्वांना सूचना देण्यात आल्याचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिले.

सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे,सर्व स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे आणि सर्व शासकीय,अशासकीय, अनुदानित,विनाअनुदानित,कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये व परिसंस्था, कला संचालनालय व त्या अधिपत्याखालील कार्यालये तसेच तंत्र शिक्षण संचालनालय व त्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था यामध्ये “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्याविषयी सर्व संबंधितांना २७ फेब्रुवारी रोजी विविध उपक्रम आयोजित करून समारंभपूर्वक “मराठी भाषा गौरव दिन” सोहळा साजरा करण्याबाबत २५ फेब्रुवारीच्या शासन परिपत्रकान्वये निर्देशित करण्यात आले आहेत. या दिवशी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागाच्या २१ जानेवारी २०१३ च्या शासन निर्नायान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरून सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयीन प्रमुखांना मराठी भाषा विभागाच्या ४ फेब्रुवारीच्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत.

तसेच उपरोक्त सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था यातील विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्ययनवर्ग सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन करण्याबाबत तसेच स्नेह संमेलने, वर्धापन दिन, समारोप समारंभ, सामूहिक उपक्रम, चर्चासत्र, शिबीर,विविध विषयांबाबतचे परिसंवाद, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने करण्याबाबतच्या सूचना १५ फेब्रुवारीच्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधित विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या आहेत.उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील उपरोक्त नमूद विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये लावण्यात येणारे नामफलक मराठी भाषेतून लावण्याबाबत तसेच ज्या ठिकाणी नामफलक इंग्रजी भाषेमध्ये लावण्यात आले आहेत, तेथे सदर फलक इंग्रजी भाषेसह मराठी भाषेत लावण्याबाबतच्या सूचना १५ फेब्रुवारीच्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.

Previous articleमहाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणार
Next articleमराठी ही छत्रपती शिवरायांची,संत ज्ञानेश्‍वरांची भाषा : मुख्यमंत्री