महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणार

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गत सरकारने केलेली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली. सदस्य विलास पोतनीस यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना त्या बोलत होत्या.

गायकवाड म्हणाल्या,राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान, गुणवत्तापुर्ण आणि आजच्या काळाशी समर्पक असे शिक्षण मिळावे ही राज्यशासनाची भूमिका आहे. राज्यातील सुमारे ८३ शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली आहे. यात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये राज्यातील १३ जिल्हा परिषद शाळांना संलग्नता देण्यात आली तर शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मराठी माध्यमाच्या शासन मान्यताप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा , स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा ७० शाळांची निवड करण्यात आली. मात्र या सर्व प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या नव्या अभ्यासक्रमाची निश्चित रुपरेखाही तयार करण्यात आली नव्हती. या सर्व त्रुटी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे हित अबाधीत राखत संबधित शाळेतील अभ्यासक्रम पुर्वी प्रमाणेच चालू ठेऊन आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची
Next article‘मराठी भाषा गौरव दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करणार