दहशतवादी संघटनेकडून मुंबई बाग आंदोलनाला फंडिग: दरेकरांचा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय नागरीकत्व सुधारणा कायदा, एन.आर.सी,एन.पी.आर. या संदर्भात सरकारची भुमिका अद्यापही स्पष्ट नसल्यामुळे या प्रश्नावरुन विघातक प्रवृत्ती रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या शाहिनबागच्या आंदोलनाला ज्या दहशतवादी मुस्लिम संघटनेने फंडिग केले,त्याच संघटनेकडून सीएएच्या विरोधातील मुंबई बागच्या आंदोलनाला फंडिग करण्यात आल्याचा गौप्यस्फोट विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केला.

राज्यामध्ये सी.ए.ए., एन.आर.सी. व एन.पी.आर. या विषयांवरुन काही विघातक प्रवृत्ती रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाहीनबागसारखे आंदोलन मुंबईमध्ये करण्याचा विघातक प्रवृत्तीचा डाव आहे. अश विघातक प्रवृत्तींना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारखी दहशतवादी संघटना संस्था आर्थिक पाठबळ देत आहे, असा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. या सर्व प्रकरणावर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे. तसेच मुख्यमंत्री सी.ए.ए.च समर्थन करीत आहेत, पण या विषयासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे, त्यामुळे आता राज्यातील कोटयवधी जनतेला या विषयावरुन सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

 अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या अतिशय जहाल दहशतवादी मुस्लिम संघटनेने दिल्ली येथील शाहीनबाग आंदोलनाला फंडींग केले. फेसबुक पेजवर या संघटनेचे अस्त्वि असून ही संघटना स्वत:ला मुस्लिमांचे न्याय हक्क स्वातंत्र्य व संरक्षणाकरिता स्थापन झाल्याचा दावा करीत आहे, मात्र ही एक दहशतवादी संघटना असल्याचा गौप्यस्फोट करताना दरेकर यांनी सांगितले की, शाहीनबाग आंदोलनाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने निधी पुरविल्याची माहिती ईडीला मिळाली आहे, त्याचप्रमाणे १.४ कोटी रुपये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित विविध खात्यात जमा करण्यात आले आहेत. याचा उल्लेख एन.आय.ए. या केंद्रिय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये नमुद करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जे नेते आणि संस्था यांच्या नावावर कोटयवधी रुपये जमा करण्यात आले आहेत. हा पैसा रोख स्वरुपात तसेच आरटीजीएस, एनईएफटी मार्फत जमा करण्यात आल्याचा आरोप करताना दरेकर यांनी सांगितले की कॉग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या खात्यावर ७७ लाख, इंदिरा जयसिंग यांच्या खात्यावर ४० लाख, दृष्यंत ए. दवे यांच्या खात्यावर ११ लाख, अब्दुल समद यांच्या खात्यावर ३.१० लाख, न्यु जोठी मार्केटींग कॉर्पोरेशन आणि न्यु जोठी जनरल प्लास्टीक इंडस्ट्रीज यांच्या नावावर १.१७ कोटी व पीएफआई कश्मीर यांच्या नावावर १.६५ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आल्याचेही दरेकर यांनी सांगितले. या संदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.राज्य सरकारने सीएए, एनआरसी व एनपीआर संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणी साठी विरोधी पक्षाने नियम २६० अन्वये आपला प्रस्ताव मांडला आहे. पण सरकार मात्र या चर्चेपासून पळ काढत आहे.दोन दिवस या विषयावर चर्चा पुढे ढकलण्यात येत आहे, या विषयावर चर्चा करण्याचे सरकारला धाडस नाही, असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

Previous articleआता सेवानिवृत्त पोलिसांनाही मिळणार वैद्यकीय सुविधेचा लाभ
Next articleहोय आम्ही शिवसेनेला फसवलं,भाजपची स्पष्ट कबूली