मुंबई नगरी टीम
मुंबई : मंत्रालयात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर मंत्रालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आज सकाळपासून मंत्रालयातील प्रत्येक दालनात महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाकडून रसायनाची फवारणी करण्यात आली असून,एकही ठिकाण शिल्लक राहणार नाही,अशा प्रकारची खबरदारी घेऊन त्यासाठीची स्वच्छता केली जात आहे.
मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळपासून अनेक अधिकारी कामाला लागले असून कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.मंत्रालयात ज्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.चाचणीअंती त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. मंत्रालयातील प्रत्येक दालने,सरकते जिने,बसण्याच्या जागा,त्रिमुर्तीसमोरील मोकळा परिसर आदी ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने रसायने टाकून स्वच्छता करण्यात आली.खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासून मंत्रालयातील प्रत्येक मंत्र्यांच्या दालनात फवारणी करण्यात आली असून त्यासोबत येथे असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही,यासाठी पिण्याच्या पाण्याचे ठिकाणे, शौचालये येथील ठिकाणे अणि त्यातील नळांवरही रसायने लावून ती स्वच्छ केली जात होती. तर ठिकठिकाणी मंत्रालयात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी विविध प्रकारची रसायने ठेवण्यात आली आहेत.
मंत्रालयात कालपासून बाहेरून येणाऱ्यांना नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यातच काल एक संशयीत रूग्ण आढल्याने अनेक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असल्याचेही चित्र येथे पहावयास मिळत होते.