मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॅाक डाऊनमुळे शेतक-यांचा भाजीपाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नसल्याने सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.तर पुरेशा भाज्या मिळत नसल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने भाजपच्यावतीन मागाठाणे विधानसभा मतदारसंघात घरपोच भाजीपाला वाटप अभियान सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत झाली नसल्याने शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला बाजारात नाही.त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी चढ्या भावाने विक्री होत आहे. सर्वसामान्यांना महागड्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत असल्याने या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने मागाठाणे मतदारसंघातील नागरिकांसाठी घरपोच भाजीपाला वाटप अभियान सुरु करण्यात आले आहे.या अभियानाचा आज प्रारंभ करण्यात आला आहे.
बोरिवली पूर्व येथील फुलपाखरु उद्यान टाटा पॉवर हाऊस येथील सभागृहात मार्केटमधून आलेल्या भाजीपाल्याची साठवण होते. तेथून छोट्या टेम्पोच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डामध्ये पाच कार्यकर्ते भाजीपाला पोहचवितात. तेथून परिसरातील कार्यकर्त्यांची टीम प्रत्येकी १० ते २५ घरापर्यंत भाजीपाला पोहचविण्याचे काम करतात हे वाटप करताना कुठेही गर्दी न करता एकटेच पोहचवित आहेत. आज वॉर्ड क्र.४, वॉर्ड क्र.५, वॉर्ड क्र.११ या वॉर्डामधील नागरिकांना भाजीपाला भाजीपाला पोहचविण्यात आला. तर आज रात्री येणारा भाजीपाला उद्या सकाळी उर्वरित वॉर्ड क्र.३, वॉर्ड क्र.१२, वॉर्ड क्र.२५, वॉर्ड क्र.२६, या वॉर्डामधील नागिरकांना वितरित करण्यात येणार आहे.अशा पध्दतीने कुठेही गर्दी न करता मागठाणे विधानसभा मतदारसंघात भाजीपाला पुरविण्याची साखळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तयार केली आहे. विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सुरू केलेल्या या अभियानामुळे मागाठाण्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.