स्थलांतर करणा-यांना थांबवा; त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विभागीय आयुक्तांना केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व लोकांचे  स्थलांतर याबाबत माहिती घेतली. करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण व पुणे विभागीय आयुक्तांना केली.

सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीतअसलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.  ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले.

Previous articleऊसतोड मजूरांच्या हाल अपेष्टा थांबवा;त्यांना घरापर्यंत  पोहोचवा
Next articleआहे त्याच ठिकाणी गरजूंची सेवा करा: देवेंद्र फडणवीस