रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला “तो “फॉर्म बनावट

मुंबई नगरी टीम

मुंबई : रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सध्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे.  शासनाने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्य शासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणताही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Previous articleशैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा
Next articleखूशखबर  : वीज दरात मोठी कपात होणार