खूशखबर  : वीज दरात मोठी कपात होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या धकाधकीच्या वातावरणात घरगुती वीज वापर करणा-या सर्वसामान्य ग्राहकांसह, व्यवसायिक वापर करणा-यांना  मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात सुचविली  असल्यामुळे वीज दरात मोठी कपात होणार आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज ही कपात  जाहीर केली आहे.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळेल. आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेकरिताचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत.मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर १८ ते २० टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर १९ ते २० टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल १० ते ११ टक्क्यांनी कमी होणार आहेत.

या दरांची निश्चिती करताना सर्व संबंधितांशी प्रदीर्घ चर्चा करून आणि तपशिलवार अभ्यासाअंती आयोगाने हा निर्णय घेतल्याचे  कुलकर्णी यांनी सांगितले. या दर कपातीमुळे उद्योग- व्यवसाय यांना मोठा दिलासा मिळेल, ते पुन्हा नव्याने उभारी घेण्यास सज्ज होतील, अशी आशा व्यक्त करून कुलकर्णी यांनी सांगितले की, ही दर कपात केवळ पुढच्या वर्षापुरती लागू राहणार नाही तर आयोगाने अशा प्रकारे इनबिल्ट पद्धत तयार केली आहे की त्यानुसार ते दर येत्या ५ वर्षापर्यंत लागू राहतील. या निर्णयामुळे शासनाला कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवून कमी दरामध्ये ग्राहकांना वीज पुरवण्यास सक्षम असतील. तथपि वीज दरात कपात झाली आहे, म्हणून ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता गरजेपुरता वापर करावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.

Previous articleरेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला “तो “फॉर्म बनावट
Next articleकोरोना इफेक्ट :  अधिकारी कर्मचाऱ्यांना या महिन्यात निम्मा पगार मिळणार