राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना केले आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्यातील टाळेबंदी येत्या ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत हातावर पोट असणा-या आणि घरापासून दूर अडकलेल्यांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. मात्र अशी मदत करताना सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या चुकीच्या कृतीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करून कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या प्रसिद्धीच्या प्रयत्नांवर बोट ठेवले आहे.त्यांनी आज एक निवेदन प्रसिद्ध करून आपली भावना व्यक्त केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवेदन पुढील प्रमाणे

सस्नेह जय महाराष्ट्र

कोरोनाच्या ह्या महासंकटाच्या परिस्थितीशी संपूर्ण महाराष्ट्र एकत्रितपणे झुंजत आहे आणि त्यात महाराष्ट्र सैनिक देखील जमेल त्या पद्धतीने कार्यरत आहेत, लोकांच्या मदतीला धावून जात आहेत, त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहेत. अर्थात राज्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटात महाराष्ट्र सैनिक धावून जातोच आणि तो आत्ताही जात आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.ह्या मदतकार्याची छायाचित्रं  मी व्यक्तिशः पाहत आहे आणि त्यातील जास्तीत जास्त कामांना एमएनएस अधिकृतवर प्रसारीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे,ज्याचा उद्देश इतकाच की त्या त्या भागातील लोकांना काही गरज असल्यास कोणाशी संपर्क साधावा हे कळावं.पण ह्या सगळ्यात एक बाब जाणवली ती म्हणजे त्यातले काही मोजके जणं कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणे, ज्याला मदत दिली जात आहे त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणे ह्या चुकीच्या गोष्टी करत आहेत.

आपण ज्याला मदत करतो आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही आहोत का? मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं पण आज प्रसंग बाका आहे त्यामुळे तो नाईलाजाने मदत स्वीकारत आहे, अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्याने देखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हे देखील सुद्धा योग्य आहे का?ह्या कठीण प्रसंगात फक्त महाराष्ट्र सैनिकच नाहीत तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील मनापासून मेहनत घेत आहेत, मदतीला धावून जात आहेत. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. माझं त्यांना पण आवाहन आहे की तुम्ही देखील ह्याचा विचार करावा. महाराष्ट्राची निरपेक्ष सेवेची परंपरा मोठी आहे, त्या परंपरेचं पुन्हा एकदा दर्शन आपण सगळ्यांनी जगाला दाखवूया.

तसंच महाराष्ट्र सैनिकांनो, जर ह्या पुढे कोणत्याही मदतकार्याची छायाचित्रं ई-मेलवर पाठवली जाणार असतील त्या मदतीच्या प्रमाणाचे, साहित्याचे, संपर्कस्थळाचे इत्यादी पुरती छायाचित्रं मर्यादित असतील हे बघावं. तसंच ह्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक दररोज काही ना काही मदत करत आहेत पण रोज त्या मदतीला अधिकृतवर प्रसारित करणं शक्य पण नाही आणि ते यथोचित होणार नाही. बाकी तुम्ही करत असलेलं काम उत्तम आहे ते सुरु ठेवावं, तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत काम करत आहात त्याचा मला अभिमान आहे.सगळ्यात महत्वाचं, सर्व राजकीय कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की  हे मदतकार्य करत असताना तुम्ही स्वतःची, तुमच्या कुटुंबाची  पण नीट काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि प्रशासनाला जास्तीत जास्त विश्वासात घेऊन काम करा.

आपल नम्र
राज ठाकरे

Previous articleखा.डॉ.श्रीकांत शिंदे घेतायत पत्रकारांच्या आरोग्याची काळजी
Next articleकोरोनाचा प्रादुर्भाव नसणा-या जिल्ह्यातील उद्योग धंदे सुरू करणार ?